Post Office Schemes: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना ऑफर करते, ज्यात अल्पबचत योजना आणि कठीण काळात कुटुंबाला सुरक्षा देणाऱ्या योजनांचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या जनसुरक्षा योजनांमध्ये तीन महत्त्वाच्या योजना येतात: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आणि अटल पेन्शन योजना. या योजनांमध्ये थोडीशी गुंतवणूक करून तुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोठी मदत मिळवू शकता. जाणून घेऊया या महत्त्वाच्या योजनांविषयी अधिक माहिती…
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना:
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही टर्म इन्शुरन्स योजना आहे जी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वार्षिक केवळ 436 रुपये भरून ही योजना खरेदी करावी लागेल.
४३६/१२=३६.३ म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने दरमहा सुमारे ३६ रुपयांची बचत केली तर तो आरामात त्याचा वार्षिक प्रीमियम भरू शकतो. १८ ते ५० वयोगटातील कोणीही ही विमा योजना खरेदी करू शकतो.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना:
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, ज्यांना खाजगी विमा कंपन्यांचे हप्ते परवडत नाहीत. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत अपघात झाल्यास २ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त २० रुपये आहे, जो गरीब लोकांनाही सहज परवडू शकतो.
अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते, आणि अपंगत्व आल्यास पॉलिसीधारकाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वय ७० वर्षांपेक्षा जास्त झाल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बंद केली जाईल.
अटल पेन्शन योजना:
आपण वृद्धापकाळासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू इच्छित असाल, तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana- APY) गुंतवणूक करणे उपयुक्त ठरेल. या योजनेद्वारे भारत सरकार दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन प्रदान करते. तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरते. १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक जो करदाता नाही, तो या योजनेत सहभागी होऊ शकतो.
अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी, सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.